शिर्डीत मनसे नगरसेवकाचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण , नगरसेवकांची पळवापळवी

शिर्डीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नगरसेवकाचं अपहरण झाल्याचं वृत्त आहे. काल (दि.24) मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केले अशी माहिती आहे. मात्र, अपहरण झालेले नगरसेवक दत्तात्रय कोते हे थोड्यावेळापूर्वीच स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्वतःहून ते लोणी पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं समजतंय.
दत्तात्रय कोते असे अपहरण झालेल्या मनसे नगरसेवकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. बाभळेश्वर जवळच्या एका हॉटेलसमोर कोते हे मध्यरात्री जेवणासाठी थांबले असताना कारमधून आलेल्या अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केल्याचे वृत्त आहे. अपहरण झाले त्यावेळी कोते यांच्यासोबत शिर्डीच्या एका नगरसेविकेचे पतीही होते, अशीही माहिती मिळते आहे. थोड्यावेळापूर्वीच लोणी पोलीस ठाण्यात हजर झालेल्या कोते यांच्याकडे त्यांचं अपहरण नेमकं कोणी आणि कसं केलं याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत . शिर्डी पालिकेतील नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर येथे राजकारणाला उत आला आहे. नगरसेवकांची पळवा-पळवी आणि लपवा-छपवी सुरु झाली आहे.