Aurangabad : बॅंकेतून बोलतो म्हणून डॉक्टरला लावला चुना…थाप मारुन मिळवला ओटीपी क्रमांक !!

एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरला थाप मारुन ओटीपी क्रमांक मिळवत परप्रांतीय भामट्याने ७० हजारांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापुर्वी देखील एमजीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरला दिल्लीतील भामट्यांनी लंडनमध्ये नोकरीचे आमिष दाखवून लाखोंना गंडविल्याचा प्रकार घडला आहे.
एमजीएम रुग्णालयातील डॉ. ईशांत रामदास करंजेकर (२६) यांच्या मोबाईलवर २५ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास परप्रांतीय भामटा अमितकुमार सिंग याने संपर्क साधला. यावेळी त्याने आपण औरंगाबादेतील आयडीबीआय बँकेच्या शाखेतून बोलत आहे. नवीन कार्डची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. तेव्हा आपल्या कार्डचा ओटीपी, डेबिट कार्ड क्रमांक आणि सीव्हीव्ही क्रमांक तात्काळ कळवा अशी थाप मारली. त्यावरुन करंजेकर यांनी भामट्याला कार्डचे सर्व क्रमांक सांगितले.
यानंतर अवघ्या काही काळात पाचवेळा करंजेकर यांच्या खात्यातून ६९ हजार ९९८ रुपये भामट्याने लांबविले. याप्रकरणी मंगळवारी सकाळी करंजेकर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी करत आहेत.