Aurangabad : ई-मेल तक्रारीवरुन महिला लेखापाल अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात , अडीच हजाराचा सापळा !!

फुलंब्रीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावर काम केल्याच्या मोबदल्याचा धनादेश देण्यासाठी तक्रारदाराकडून अडीच हजारांची लाच स्विकारणा-या सहायक भांडारपाल तथा लेखापाल महानंदा भिकन जाधव (३२, रा. गल्ली क्र.१, गजानननगर, गारखेडा परिसर) हिला अॅन्टी करप्शन विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे लाच मागितल्याची तक्रार ई-मेलव्दारे पाठविण्यात आली होती.
तक्रारदार काही दिवसांपासून फुलंब्रीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावर काम करतात. त्यांनी कामाच्या मोबदल्यात सहायक भांडारपाल तथा लेखापाल महानंदा जाधवकडे धनादेशाची मागणी केली होती. मात्र, जाधवने पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती अडीच हजार रुपये देण्या-घेण्याचे ठरले. पण तक्रारदाराने ई-मेलव्दारे अॅन्टी करप्शनला तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीवरुन अॅन्टी करप्शनचे उपअधीक्षक बी. व्ही. गावडे, निरीक्षक महादेव ढाकणे, जमादार गणेश पंडुरे, पोलिस नाईक संदीप आव्हाळे, दिगंबर पाठक, बाळासाहेब राठोड आणि संदीप चिंचोले यांनी छापा मारुन महानंदा यांना अडीच हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले. जाधवविरुध्द फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.