Zarkhand : ” जय हनुमान” आणि “जय श्रीराम”च्या घोषणांची सक्ती करत जमावाकडून मारहाण, पुण्यातील तरूणाचा मृत्यू

जय श्रीरामचे नारे दे असे म्हणत एका तरूणाला जमावाकडून मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान या तरूणाचा मृत्यू झाला. हे सगळे प्रकरण झारखंड येथील रांचीमध्ये घडले आहे. शम्स तरबेज असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. त्याला जमावाने सुमारे सात तास मारहाण केली. बाईक चोरल्याच्या संशयावरून त्याला मारहाण करण्यात आली. मागच्या मंगळवारी हा सगळा प्रकार घडला त्यानंतर तरबेजला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला असून एएन आय आणि एनडीटीव्ही इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे .
मंगळवारी सुमारे सात तास मारहाण केल्यानंतर या तरूणाला बुधवारी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्याआधी मारहाण करताना जमावाने तरबेजला ‘जय श्रीराम’ जय हनुमान या घोषणा देण्याची सक्ती केली होती. १८ जून रोजी (मागच्या मंगळवारी) हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर बुधवारी या तरूणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मारहाणीमुळे तो अर्धमेला झाला होता. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला २२ जून रोजी (शनिवार) रूग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारा दरम्यान त्याचा रविवारी मृत्यू झाला. तरबेजच्या मृत्यू प्रकरणी आरोपी पप्पू मंडलला अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान तरबेजचा नातेवाईक मक्सुद आलम यानेही तरबेजला जमावाने मारहाण केली आणि जय श्रीराम आणि जय हनुमानचे नारे दे असे सांगत त्याला बडवलं असा आरोप केला आहे. तरबेज हे नावच मुस्लीम असल्याने जमावाने त्याला मारहाण केली. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना अटक करण्यात यावी अशीही मागणी मक्सुद आलमने केली आहे.
तरबेज हा पुण्यात वेल्डर म्हणून काम करत होता. कुटुंबीयांसोबत ईद साजरी करता यावी म्हणून झारखंडला गेला होता. येत्या काही दिवसात त्याचा निकाह देखील होणार होता. १८ जून रोजी दोघांसोबत तरबेज निघाला, त्या दोन व्यक्तींनी त्याची दिशाभूल करून त्याला घेऊन गेल्या. त्यानंतर आम्ही तुझ्यासोबत आहोतच असं दर्शवून या दोघांनी पोबारा केला आणि तरबेजला चोरीच्या आरोपावरून जमावाने जबरदस्त मारहाण केली अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.