जामिनावर सुटलेल्या २०० आरोपींच्या प्रत्येक हालचालीवर औरंगाबाद गुन्हे शाखेचे लक्ष : मधुकर सावंत

जामिनावर सुटलेले पण घरफोडीसह इतर वेगवेगळ्या गुन्ह्यातील २०० आरोपींच्या प्रत्येक हालचालींवर आता गुन्हे शाखेचे विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी मॉनिटरिंग सिस्टिम तयार करण्यात आलेली आहे. हे सर्व आरोपी सध्या जामिनावर सुटलेले असून त्यांच्या हलचालीवर २४ तास गुन्हे शाखेचे लक्ष राहणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी महानायक ऑनलाईनशी बोलताना दिली.
गुन्हेगारी वृत्तीचे आरोपी जामिनावर सुटलेले असले तरी त्या कालावधीत ते काही ना काही गुन्हे करीतच राहतात. जामिनावर सुटलेल्या काळात असे आरोपी दुसऱ्या जिल्ह्यात, प्रदेशात जावून पुन्हा घरफोडीसारखे गुन्हे करतात. नव्या ठिकाणी ते त्यांचा मित्रवर्ग तयार करतात. अशा आरोपींच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आता गुन्हे शाखेने मॉनिटरिंग सिस्टिम तयार केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.
जामिनावर सुटलेल्या आरोपीत घरफोडीच्या गुन्ह्यातील ७६ तर लुटमारी करण्याच्या गुन्ह्यातील जवळपास ४० आरोपी आहेत. इतरही मंगळसूत्र चोरी, खून, प्राणघातक हल्ला करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील मिळून २०० आरोपी असे आहेत की जे जामिनावर सुटून कारागृहाबाहेर गेलेले आहेत. अशा आरोपींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी एक पथक नियुक्त केलेले आहे. आरोपींचे सध्याचे राहण्याचे ठिकाण, मित्र, नातेवाईक, मोबाईल क्रमांक, अशी सर्व अद्यायवत माहिती पथकाकडे असणार आहे. याशिवाय काही भुरट्या चोरट्यांवर त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणच्या पोलीस ठाण्याच्या अधिकाNयांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक सावंत यांनी सांगितले.
सावंत हे १९९३ साली पोलीस दलात उपनिरीक्षकपदी रुजू झाले. २५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी वर्धा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, राज्य गुप्ता वार्ता, विशेष सुरक्षा विभाग औरंगाबाद येथे काम केले. औरंगाबाद शहर पोलीस दलात गुन्हे शाखेचे निरीक्षक म्हणून २०१६ पासून कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून तब्बल २९० बक्षिसे आणि ७२ प्रशस्तीपत्रे मिळाली आहेत.
गुन्हे शाखेत कार्यरत असल्यापासून त्यांनी खुनाचे १२ गुन्हे उघडकीस आणून आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरोड्याच्या तयारीतील ५ गुन्हे, बलात्काराचे २, जबरी चोरीचे २९, मंगळसूत्र चोरीचे १३, तर घरफोडीचे ६६ गुन्हे उघडकीस आणली. वाहनचोरी, मोबाईलचोरी, चोरीचे १८६ गुन्हे उघडकीस आणून ३१३ आरोपींना अटक केली. या आरोपींकडून तब्बल ७ कोटी ५६ लाख ७३ हजार १०१ रुपयांचा ऐवज जप्त केला. यासोबत अन्य अवैध धंदे करणाऱ्या ५९० जणांना अटक करून त्यांच्याकडून १ कोटी ४४ लाख २ हजार ९३२ रुपयांचा ऐवज जप्त केलेला आहे . उल्लेखनीय सेवेबद्दल सावंत यांना पोलीस महासंचालकांचे पदक प्राप्त झालेले असून ते कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात.