Vidhan Parishad : प्राध्यापकांच्या मुलाखतीचे व्हिडीओ शूटिंग , शिक्षक भरतीत भ्रष्टाचार झाल्यास कारवाई : रवींद्र वायकर

विविध शासन अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापकांच्या भरतीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी यापुढे प्राध्यापक भरती दरम्यान घेण्यात येणार्या मुलाखतींचे व्हिडीओ शुटींग करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधान परिषदेत दिले. त्याचबरोबर अकोला ,धुळे व शहापुर येथील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षक भरती दरम्यान भ्रष्ट्राचार झाल्याच्या आरोपाची चौकशी करुन यात कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले. तसेच प्राध्यापकांच्या नेमणुकांमध्ये एमीपीएससीच्या धर्तीवर सेंट्रलाईझ प्रोसेसिंग पद्धत अवलंबण्यात येणार असल्याचे सांगत प्रभारी प्राचार्यांच्या जागा येत्या तीन महिन्यांमध्ये भरण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
विधान परिषद सदस्या डॉ. मनिषा कायंदे यांनी राज्यातील अनुदानित महाविद्यालयात सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या भरतीमध्ये एका जागेसाठी उमेवारांकडून सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांची मागणी होत असल्याचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. अकोला येथील एका संस्थेने अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्थशास्त्र व गृहविज्ञान या विषयांसाठी संस्थाचालकांनी ४५ लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. खुल्या गटातील जागा असेल तर तब्बल ५० लाखांची मागणी होत असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. अशा प्रकारे प्राध्यापकांच्या भरती दरम्यान होणार्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी? अशा प्रकरणांमध्ये जे दोषी सापडले त्यांच्यावर ठराविक मुदतीत कारवाई करणार का? ज्या महाविद्यालयात प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत, त्या भरणार का? महाविद्यालयांमध्ये रिक्त असणार्या प्राचार्यांच्या जागा कधी भरणार? असे प्रश्न उपस्थित केले.
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य या संवर्गातील रिक्त पदे भरण्यास शासनाने २३ एप्रिल २०१८ रोजी मान्यता दिली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील सुमारे ४ हजार ७३८ इतक्या प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास मान्यता दिली असल्याची माहिती वायकर यांनी दिली. आजपर्यंत ११९ संस्था / महाविद्यालयांना रिक्त पदे भरण्याकरीता ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले असून जाहीरात देऊन भरती प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयांतील प्राध्यापक भरती दरम्यान महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्यात येतो. अकोला येथील श्रीमती राधादेवी गोयंका महाविद्यालय, धुळे व शहापुर या महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीवेळी गैरव्यवहार झाल्याच्या करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी करुन यात कुणी दोषी आढळल्यास महिन्याभरात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन वायकर यांनी सभागृहाला दिले.