विधान सभा महाराष्ट्र : मराठा आरक्षणाचा अजेंडा पूर्ण केल्याचा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा

राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मराठा आरक्षण हा आमचा अजेंडा होता आणि आम्ही तो पूर्ण केल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केला. मराठा आरक्षणावर झालेले शिक्कामोर्तब गेल्या सत्तर वषार्तील मोठे यश असल्याचेही पाटील म्हणाले. दरम्यान मुस्लिम आरक्षणावरून विरोधकांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. आताचे मुस्लिम हे पूर्वीचे हिन्दू होते. सध्या त्यांच्यातील ओबीसी वर्गाला आरक्षण आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनपर प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या विकास कामांचा आढावा घेतला. भाजपा सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या या ठरावावर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरी वीस सदस्यांनी भाषणे केली. यावेळी पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणात कोणतीही त्रुटी राहणार नाही याची पूर्ण काळजी राज्य सरकारने घेतली होती. मराठा आरक्षणासाठी कोंग्रेस आघाडी सरकारने विविध आयोग नेमले, पण हा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यास ते अयशस्वी ठरले. मात्र, भाजप सरकारने आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगाने खूप चांगले काम केले. राज्य मागास आयोगाचे मोठे योगदान असल्यामुळे मराठा समाज मागास असल्याचे घटनात्मकदृष्ट्या निश्चित झाले.
राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात ११६ मुद्दे मांडले. विरोधकांनी मात्र त्यातील चार-पाच मुद्दयांवरच चर्चा केली. त्यातही लोकसभा निकालावरच जास्त चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममुळे नाही तर विविध लोकोपयोगी कामांमुळे जनतेने आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केले. जर ईव्हीएम तुमचा विश्वास नाही तर बारामती लोकसभा मतदार संघात निवडून आलेल्या खासदाराने राजीनामा द्यायला पाहिजे होता, असा टोला पाटील त्यांनी लगावला.