पुणेरी उसळच नाहीत तर , पंतप्रधान नरेंद्र मोदीही आहेत , जगात भारी !! कसे ते पहा ….

https://twitter.com/HeraldBritish/status/1131483984016363520
लंडनमधील ‘ब्रिटिश हेराल्ड’ या मासिकाने घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘२०१९ मधील जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती’ असल्याचा कौल वाचकांनी दिला आहे. या सर्वेक्षणामध्ये मोदींने अनेक बड्या नेत्यांना मागे टाकत वाचकांची पसंती मिळवली. मोदी हे सध्याच्या घडीला जगातील सर्वात शक्तीशाली नेते असल्याचे मत ३०.९० टक्के वाचकांनी नोंदवले आहे.
या सर्वेक्षणामध्ये जगभरातील एकूण २५ मोठ्या व्यक्तींच्या नावांचा समावेश होता. या सर्वेक्षणामधील प्रथामिक टप्प्यांनंतर तज्ज्ञांच्या समितीने चार जणांचा अंतिम फेरीसाठी निवड केली होती. वाचकांच्या मतांबरोबर संबंधित व्यक्तींसंदर्भात अभ्यास आणि अहवाल तयार करुन मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याचे ‘ब्रिटिश हेराल्ड’ने म्हटले आहे. या सर्वेक्षणात मोदींना ३०.९० टक्के, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना २९.९० टक्के, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २१.९० टक्के तर चीने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना १८.१० टक्के मते मिळाली आहेत.
ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आलेल्या या जनमत चाचणीमध्ये खोटी मते नोंदवली जाऊ नयेत म्हणून प्रत्येक वाचकाला सर्वेक्षणाचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी ओटीपी (वन टाइम पासवर्ड) देण्यात आला होता. या जनमत चाचणीला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाल्याने अनेकदा वेबसाईट क्रॅशही झाली. या सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांनी वेबसाईटला एकाच वेळी भेट दिल्याने वेबसाईट क्रॅश झाल्याचे ‘ब्रिटिश हेराल्ड’ने म्हटले आहे. ३० लाख लोकांनी एका आठवड्यात वेबसाईटला भेट दिली. मात्र किती लोकांनी या सर्वेक्षणामध्ये मत नोंदवले याबद्दल वेबसाईटने आकडेवारी दिलेली नाही.
१५ जुलै २०१९ रोजी प्रकाशित होणाऱ्या ‘ब्रिटिश हेराल्ड’च्या मासिकाची कव्हर स्टोरी ही मोदींबद्दल असणार असून मुखपृष्ठावर मोदींचा फोटो असणार आहे. हे मासिक अॅमेझॉन किंडलवर उपलब्ध होणार आहे. मे आणि एप्रिलच्या अवृत्तीच्या मुखपृष्ठावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा फोटो होता.
मागील काही महिन्यांमध्ये दहशतवादाविरोधात भारत सरकारने घेतलेली कठोर भूमिका, बालाकोट एअरस्ट्राईक आणि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोदींची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे भारतीय प्रसारमाध्यांचे म्हणणे असल्याचे निरिक्षण ‘ब्रिटिश हेराल्ड’ने नोंदवले आहे. मोदींच्या आयुषमान भारत योजना, पंतप्रधान उज्वला योजना, स्वच्छ भारत योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही या लेखात म्हटले आहे.
बेरोजगारी आणि वाढत्या थकीत कर्जामुळे (एनपीए) भारतीय बँकिंग क्षेत्राचे कंबरडे मोडलेल्याने मोदींवर टिकाही झाली. २०१४ निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांनुसार इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यात मोदी सरकार अपयशी ठरत असल्याबद्दल सरकारवर सर्वच स्तरातून टिका झाली. मात्र या टिकेचा परिणाम मोदींच्या लोकप्रियतेवर झाला नाही आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि मित्रपक्षांना ३५३ जागांवर विजय मिळवला. या विजयासहीत मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत असं ‘ब्रिटिश हेराल्ड’नं म्हटलं आहे.
मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी काही जोखमी असणारे निर्णय घेतले. यामध्ये नोटबंदी, जीएसटी सारख्या महत्वाच्या निर्णयांचा समावेश होता. या निर्णयांमुळे लघुउद्योजक आणि मोठ्या उद्योगांनाही फटका बसला. तरीही भारतीयांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी सरकारच्या बाजूने मतदान करत पुन्हा त्यांच्या हाती पुढील पाच वर्षांसाठी सत्ता दिली असल्याचे ‘ब्रिटिश हेराल्ड’ आपल्या लेखामध्ये म्हटले आहे. ‘ब्रिटिश हेराल्ड’चा हा लेख हर्ष सिंग यांनी लिहिला आहे.