मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड व विदर्भातील यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड व विदर्भातील यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यात प्रामुख्याने भूकंपाचे जाणवले आहेत. किनवट माहुर तसेच पवना परिसरात भूकंपाच्या धक्क्यानंतर भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक लोक घाबरून रस्त्यावर आले आहेत.
रात्री साडेनऊच्या सुमारास विदर्भ-मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर ग्रामीण भागातील लोक घराबाहेर आले. भूकंपामुळे माहूर येथे काही घरांवरील टिनाचे पत्रे कोसळले. भिंतींनाही तडे गेल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. घरांमधील लाकडाच्या फळ्यांवरील भांडी खाली पडली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात सदोबा-सावळीपासून काही अंतरावर असलेल्या चिंचबर्डी, बारभाई, इचोरा, माळेगाव, वरुड-उमरी या गावात हे धक्के जाणवले. महागाव तालुक्यातील हे धक्के बसले. दरम्यान या धक्क्यांमुळे किनवट तालुक्यातील दहा घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून जिल्हा प्रशासन पुढील उपाय करीत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील मराठवाडाच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तीन ते पाच सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. तसेच काही घरांना भूकंपाच्या धक्क्याने काही घरांना तडे गेले आहेत.
नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातात देखील भूकंपाचे धक्के काही प्रमाणात जाणवले. याच भागातील अंजनखेड, राणीधानोरा, गोंडवडसा, साकूर, कवठा बाजार, कोसदनी, अंबोडा येथेसुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावातील नागरिकांनी भीतीने रस्त्यावर धाव घेतली.
पैनगंगा नदीच्या अलिकडील भागातही हे धक्के जाणवले आहे. उमरखेड तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, विडूळ, मन्याळी, वडद, मुडाणा, बेलखेड या गावांनाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.