Rafale deal : राहुल गांधींच्या मते हा चोरीचा मामला , केंद्रीय दक्षता आयोगाकडून चौकशीची मागणी

‘राफेल करार हा चोरीचा मामला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाकडून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही आधीच केली आहे. माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे,’ असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज स्पष्ट केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर केलेल्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात भारताच्या शस्त्रसज्जतेवर भाष्य केलं होतं. ‘केंद्र सरकार देशाला संरक्षणसज्ज करण्यास कटिबद्ध आहे. लवकरच राफेल लढाऊ विमानं भारतीय संरक्षण दलाच्या ताफ्यात दाखल होतील’, असं ते म्हणाले होते.
राहुल गांधी यांना याबाबत विचारले असता, ‘या मुद्द्यावर माझी भूमिका बदलेली नाही. राफेल करारात भ्रष्टाचार झाला आहे, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आहे. त्यामुळं त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील एका प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘माझ्यानंतर पक्षाचा अध्यक्ष कोण असेल हे ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षाचा आहे. माझा नाही,’ असं त्यांनी सांगितलं.