नवी नवरी , देव देव करायला नवऱ्यासोबत गेली आणि प्रियकरासोबत पसार झाली !!

अहमदनगर जिल्ह्यात एक नवविवाहित जोडपे लग्नानंतर मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी नवविवाहित महिला मंदिरातूनच प्रियकरासोबत पळून गेली. पाथार्डी शहरातील माधी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. ही संपूर्ण घटना मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.
शेगाव येथे रहाणारा युवक पत्नीसोबत बुधवारी कनिफनाथ मंदिरात दर्शनासाठी आला होता. लग्नानंतर देवदर्शनासाठी मंदिरात जाण्याची पद्धत आहे. तीन दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. जोडप्याने त्यांची दुचाकी मंदिरात पार्किंगच्या जागेमध्ये उभी केली होती. मंदिरातून बाहेर आल्यानंतर नवरा पार्किंग लॉटमध्ये त्याची बाईक आणण्यासाठी गेला. तीच संधी साधून पत्नी तिच्या प्रियकरासोबत बाईकवर बसून पळून गेली.
नवरा बाईक घेऊन परत आला त्यावेळी पत्नी त्याला जागेवर दिसली नाही. त्याने पत्नीचा शोध सुरु केला. आसपासच्या दुकानदारांनाही विचारले. पण कोणालाच काहीच माहित नव्हते. अखेर त्याने मंदिर समितीकडे धाव घेतली. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर आले. पत्नीचा प्रियकर दोघांच्या मागे फिरत होता. पत्नी त्याला इशारे करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.