Loksabha 2019 : संसदेत रामदास आठवले म्हणतात आम्ही आता काँग्रेसला सत्तेत येऊच देणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे मोठा जनाधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने बहुमतात निवडून दिले आहे. पुढील पाच काय तर अनेक वर्ष आमचंच सरकार असेल असं सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आम्ही तुम्हाला सत्तेत येऊच देणार नाही, असं आपल्या शैलीत काँग्रेसला सांगितलं. यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. बिर्ला हे अनुभवी व्यक्ती आहेत. ते कधीच हसत नाहीत. परंतु मी तुम्हाला सभागृहात हसवणार असल्याचे सांगत आठवले यांनी त्यांचे स्वागत केले.
लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीतून अभिनंदन केले. आपल्या कवितेतून त्यांनी बिर्ला यांचे स्वागत केले. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. निवडणुकीपूर्वी अनेकदा काँग्रेसने आपल्याला त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली होती. परंतु हवा कोणत्या दिशेने जात हे मी अचूक ओळखलं आणि भाजपासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. जनतेने सरकारला दिलेला कौल पाहता विरोधकानीही सभागृहाच्या कामकाजात सत्ताधारी पक्षाला मदत करावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. तसेच आपलं सरकार सर्व राज्यांना समान न्याय देईल. पुढील पाच काय तर वर्षानुवर्ष आमचंच सरकार येत राहिल. आम्ही काँग्रेसला सत्तेत येऊच देणार नाही, अशी मिश्कील टीकाही त्यांनी यावेळी केली. यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता.