शिवसेनेच्या वर्धापन दिनी वदले देवेंद्र , मंत्री -मुख्यमंत्री गौण !! विधानसभेत न भूतो असा विजय मिळवायचाय …

‘मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण या चर्चा आमच्यासाठी गौण आहेत. या चर्चा मीडियाला चघळू द्या. त्याचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही. त्याबाबत जेव्हा निर्णय घ्यायचा तेव्हा आम्ही घेऊच. आपल्यासमोर आता एकच लक्ष्य आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला ‘न भुतो’ असा विजय मिळवायचा आहे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात केलं.
शिवसेना-भाजप ही वाघ-सिंहाची जोडी आहे आणि वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते तेव्हा जंगलात राज्य कोण करणार, हे सांगावे लागत नाही. आता ५६ पक्ष एकत्र येवोत की, १५६ पक्ष एकत्र येवोत कौल वाघ-सिंहालाच मिळणार, हे पक्कं आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
दोन भाऊ एकत्र राहतात तेव्हा कधी कधी ताणतणाव निर्माण होतोच पण हा तणाव आता दूर झाला आहे. भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे, असे नमूद करत युती भक्कम असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.