राम जन्मभूमी परिसर दहशतवादी हल्ला, चौघांना जन्मठेप, एकाची निर्दोष मुक्तता

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात २००५ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रयागराजच्या विशेष न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. या प्रकरणी दोषी ठरलेल्या पाचपैकी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, तर एका आरोपीची मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ६३ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव अंतिम सुनावणी प्रयागराजच्या नॅनी सेंट्रल जेलच्या अस्थायी विशेष न्यायालयात झाली. येथे पाचही आरोपी इरफान, मोहम्मद शकील, मोहम्मद नसी, मोहम्मद अजीज आणि आसिफ इकबाल ऊर्फ फारुख कोठडीत होते.
५ जुलै २००५ रोजी सकाळी सव्वा नऊ वाजया राम जन्मभूमी परिसरातील संरक्षक जाळी आणि आसपासच्या परिसरात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी अंदाधुंद गोळीबार करत बॉम्बस्फोट करण्यात आला होता. यात सुरक्षेसाठी तैनात असलेले अनेक जवान जखमी झाले होते. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी ठार झाले होते. नंतर आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली. या हल्ल्यात दोन सामान्य नागरिक ठार झाले तर सात अन्य जखमी झाले होते.