Good News : मान्सून तीन दिवसांत कोकणात होणार दाखल

‘वायू’ चक्रीवादळामुळे रखडलेला मान्सून आता सक्रीय झाला असून येत्या ३ दिवसांत कोकणात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मान्सून यंदा केरळातच विलंबाने दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या वायू चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली. परिणामी जूनचा पंधरवडा यात गेल्याने देशभरात पावसाची सरासरी तूट मात्र ४३ टक्क्यांवर पोहोचली आहे.
सामान्य स्थितीत मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होतो. यंदा तो विलंबाने दाखल झाला शिवाय त्याची पुढची वाटचालही चक्रीवादळामुळे मंदावली. एव्हाना देशाच्या मध्यापर्यंत मान्सून पसरतो. पण यंदा तो दक्षिणेतच रेंगाळला आहे. वायू चक्रीवादळाचा जोर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ओसरल्याने आता मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परिणामी येत्या २० ते २१ जूनपर्यंत मान्सून कोकणमार्गे राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाच्या परिणामामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणसह मुंबईत गेले दोन दिवस पाऊस पडला. मात्र रविवारपासून पुन्हा हवा कोरडीठाक झाल्याने मान्सूनची मुंबईकरांना अद्याप प्रतीक्षाच आहे.