मध्य भारतात २० जून नंतर मूळधार पाऊस होण्याची शक्यता , भारतीय हवमान खात्याचा अंदाज

वायू चक्रीवादळामुळे देशाच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. भारतीय हवमान विभागाच्या म्हणण्यानुसार, २० जूनपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. २० तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसात सर्तक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मध्य भारतात मूळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. त्यामुळे या भागांमध्ये सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यापासून मुंबईसह सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी अनेक भागांत २ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तर मुंबईतही पावसाचा जोर कमी आहे. स्कायमेटचे जेपी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्या भारतातही पावसाचा जोर कमी प्रमाणात आहे. पण २० जूननंतर मात्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मूसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रविवारी अनेक भागांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस झाला. कर्नाटक, म्हैसूर,गंगटोकमध्ये पावसाने हजेरी लावली. पण तसं पाहायला गेलं तर मान्सून नियमानुसार यंदा १० दिवस उशिराने सुरू आहे. त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका जाणवला. त्यात अवकाळी पावसानं पिकाचं, चारा छावण्यांचं त्याचबरोबर फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं.
आतापर्यंत ४३ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये आतापर्यंत ५९ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पूर्व भागामध्ये ४७ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. कारण खरीपाचं पिकं म्हणजे भात, मका, ज्वारी, बाजरी, मूग, शेंगदाणे, ऊस, सोयाबीनची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा पावसाकडे आहेत. अनेक ठिकाणी पावसाच्या कमतरतेमुळे अजूनही मोठा पाणी प्रश्न आहे.