डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी तपासात सहकार्य करीत नसल्याने जमीन न देण्यासंबंधी क्राईम ब्रँचचा कोर्टाला अहवाल

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जाला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं जोरदार विरोध करत हा अर्ज फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. आरोपी तपासकार्यात सहकार्य करत नसून तपासात गुन्ह्याशी संबंधित अनेक गोष्टी सापडणं आणि अनेक गोष्टींचा खुलासा होणं अद्याप बाकी आहे, असा अहवाल सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात सादर करण्यात आला. अटकेत असलेल्या तिन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रिमांड २१ जूनला संपणार आहे. या जामीन अर्जावरील सुनावणी तूर्तास १९ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
दरम्यान तडवी कुटुंबियांच्यावतीनं हे प्रकरण अॅट्रॉसिटीचं असल्यानं या सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी केली. कोर्टानं ही विनंती मान्य करत पोलीस तसेच कोर्ट कर्मचाऱ्यांना व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
मात्र काही तांत्रिक कारणांनी सोमवारी हो व्हिडीओ रेकॉर्डींग होऊ शकलं नाही. मात्र आरोपींच्या वकिलांनी खटल्याची सुनावणी व्हिडीओ रेकॉर्डींगमध्ये होऊ द्या. मात्र जामीन अर्जावरील सुनावणीसाठी रेकॉर्डींग उपलब्ध होईपर्यंत थांबण्याची गरज नाही. तसा आग्रह असेल तर आरोपींना अंतरीम जामीन मंजूर करावा अशी मागणी कोर्टाकडे केली आहे.
डॉ. पायलने नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी तिच्या तीन सहकारी महिला डॉक्टरांना अटक केली आहे.
यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्टरांवर रॅगिंग आणि ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.