World Cup 2019 : पावसामुळे भारत-पाक सामना अद्याप अनिश्चित

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होत असून या लढतीवर पावसाचे सावट असल्याने सगळ्यांच्याच मनात धाकधूक आहे. मँचेस्टरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा पाऊस पडला. त्यानंतर काल शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि आजही ढगांची दाटी झालेली आहे. हवामान विभागाने आज येथे पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सामना होणार का?, झाला तर किती षटकांचा होणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. इंग्लंडमधील लहरी हवामानाचा फटका वर्ल्डकपमधील अनेक सामन्यांना बसला आहे. आजच्या भारत-पाक सामन्यातही पाऊस व्हिलन ठरण्याचा धोका आहे.
आज पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून पावसाच्या हलक्या तसेच जोरदार सरी येतील. तापमान जवळपास १७ अंश सेल्सियस राहील, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे. त्यामुळे सामना रद्द होईल, अशी शक्यता नसून निश्चितच षटकं मात्र कमी होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. शनिवारी मँचेस्टरमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सध्यातरी मैदानावरील खेळपट्टी झाकण्यात आलेली आहे. आज येथे हलक्या सरी आल्या पण नंतर पाऊस पूर्णपणे थांबल्याने येथे दाखल झालेले चाहते काहीसे सुखावले आहेत. दरम्यान, वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ४ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यात भारताचाही न्यूझीलंडविरुद्धचा सामना आहे.