विधानसभा निवडणुकीत आठवलेंना हव्या आहेत १० जागा

फडणवीस मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार असून, कोणाकोणाला संधी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात आठवलेंच्या रिपाइंलाही एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. आठवलेंचे खास मित्र आणि जुने विश्वासू सहकारी अविनाश महातेकर उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील, असं आठवलेंनीच सांगितलं आहे. ते म्हणाले, कॅबिनेट मंत्रिपदासाठी अविनाश महातेकरांचं नाव पुढे पाठवलं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांना सोडण्यात येणाऱ्या १८ ते २० जागांपैकी १० जागा आरपीआयला मिळायला हव्यात, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे.
किती आणि कोणत्या जागा सोडायच्या हे शिवसेनेसोबत बोलून ठरवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचंही आठवलेंनी अधोरेखित केलं आहे. त्यानंतर अविनाश महातेकरांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आरपीआयला ५ टक्के पदं मिळाली पाहिजेत, असा भाजपाबरोबर केला होता, आरपीआयच्या नेत्यांना विधानसभा आणि विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली नाही. तरीही आम्हाला राज्यात मंत्रिपद मिळणार असल्यानं आनंदी आहोत, रामदास आठवलेंनाही दोनदा मंत्रिपद दिल्याबद्दल आम्ही भाजपाचे आभारी असल्याचंही महातेकर म्हणाले आहेत. अविनाश महातेकर हे रिपाइं आठवले गटाचे सरचिटणीस आहेत. त्यांचं नाव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आल्याची माहिती खुद्द रामदास आठवले यांनीच दिली आहे. दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानलेत.
शिवसेनेकडून तानाजी सावंत की अनिल परब?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली. शिवसेना दोन मंत्रिपदांबाबत आग्रही आहे. त्यापैकी एक, राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना दिलं जाऊ शकतं, तर दुसरं तानाजी सावंत किंवा अनिल परब यांना मिळण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत हे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांचं गाव माढा तालुक्यात आहे. त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालून शिवसेना राष्ट्रवादीला शह देऊ इच्छिते.