World Cup 2019 Good News : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार, पावसाची शक्यता मावळली

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर असणारं पावसाचं सावट कमी झालेलं आहे. मँचेस्टरच्या मैदानावर रविवारी भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत. मात्र गेल्या आठवडाभर मँचेस्टरमध्ये पाऊस पडत होता, त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाही पावसामुळे वाया जातो की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र अखेरीस हे संकट आता कमी झालेलं आहे. खुद्द आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेला आतापर्यंत अनेकदा पावसाचा फटका बसला आहे. ४ सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. पावसाच्या या व्यत्ययामुळे सामन्यांचं प्रक्षेपण करणाऱ्या स्टार इंडिया कंपनीला अंदाजे १०० कोटींचा फटका बसल्याचं बोललं जातंय. मात्र शनिवारी मँचेस्टरमध्ये पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे दोन्ही संघानी मैदानात येऊन सराव केला. सराव संपल्यानंतर काहीकाळ पावसाने हजेरी लावली होती, मात्र रविवारी रंगणाऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणण्याची शक्यता कमी झालेली आहे. त्यामुळे रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.