2024 : भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे ध्येय : नरेंद्र मोदी

सन २०२४ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलरपर्यंत (५ लाख कोटी डॉलर) पोहोचवण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हे ध्येय गाठणे आव्हानात्मक असले तरी प्राप्त करण्यासारखे आहे. त्यासाठी राज्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याची भुमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निती आयोगाच्या शनिवारी झालेल्या पाचव्या बैठकीत मांडली. या बैठकीला देशातील सर्व राज्यांच्या मुख्यंमंत्र्यांना हजेरी लावली होती. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे अनुपस्थित होते.
मोदी म्हणाले, आगामी काळात सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या धोरणाची अंमलबजावणी करण्यात निती आयोग महत्वाची भुमिका बजावेल. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भारताच्या विकासासाठी आता प्रत्येकाने काम करण्याची वेळ आली आहे. देशातील गरीबी, बेरोजगारी, दुष्काळ, अन्न, प्रदुषण, भ्रष्टाचार आणि हिंसाचार या मुद्द्यांवर एकत्रितपणे लढण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सन २०२४ पूर्वी भारताला ५ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. हे मोठे आव्हान आहे मात्र ते गाठता येऊ शकते. यासाठी राज्यांनी त्यांची मूळ क्षमता ओळखून जिल्हा स्तरावर जीडीपीचे टार्गेट वाढवण्यासाठी काम करायला हवे, अशी अपेक्षा यावेळी मोदींनी व्यक्त केली.
दरम्यान, देशाच्या बहुतांश भागात सध्या दुष्काळसदृश्य स्थिती आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावशाली पावले उचलायला हवीत, त्यासाठी ‘पर ड्रॉप, मोअर क्रॉप’ ही नीती अवलंबायला हवी, असेही ते यावेळी म्हणाले. नव्याने तयार करण्यात आलेले जलशक्ती मंत्रालय हे पाण्याबाबत एकात्मिक दृष्टीकोन राखण्यात तसेच राज्यांकडून एकत्रितपणे पाण्याचे संवर्धन आणि नियोजन करण्यासाठी मदत करेल, अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.