सेफ्टिक टँकमध्ये श्वास गुदमरून चार सफाई कर्मचाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू

गुजरातमधल्या बडोदा जिल्ह्यात एका हॉटेलमधील सेफ्टिक टँक साफ करत असताना घुसमटून चार सफाई कर्मचाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद दभोई पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पोलीस कर्मचारी, अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बचावकार्य राबवण्यात आलं असून, तक्रारही नोंदवण्यात आली आहे.
बडोदा शहरापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या दभोई तहसीलच्या फर्तिकुई गावातल्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. हॉटेलमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दभोई तालुक्यातील थुववी गावातील चार जण सेफ्टिक टँक साफ करण्यासाठी टाकीमध्ये उतरले होते. जेव्हा एक सफाई कर्मचारी मॅनहोलमधून बाहेर आला नाही, तर इतर जण त्याला पाहण्यासाठी टाकीत उतरले आणि सगळ्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेत हितेश हरिजन (23), त्यांचे वडील अशोक हरिजन (45), महेश हरिजन (25), महेश पन्नवाडिया (46), विजय चौधरी (22), शाहदेव वसावा(22) आणि एकाचं नाव अजय असं आहे. या घटनेनं दभोई परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.