“आमच्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच सुप्रीम कोर्ट !!” उद्धव ठाकरे आपले १८ खासदार घेऊन उद्या निघाले अयोध्येला…

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होत असला तरी , नियोजित कार्यक्रमाप्रमाणे राम मंदिर उभारणीचा अजेंडा घेऊन उद्धव ठाकरे उद्या म्हणजे १६ जूनला अयोध्येला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालीच अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी होईल आणि आमच्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच सुप्रीम कोर्ट आहेत, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत आजच अयोध्येत पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे रविवारी सकाळी ९ वाजता अयोध्येत पोहोचतील. एअरपोर्टहून ते लगेचच रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नवे १८ खासदारही असतील. राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही तर आस्थेचा विषय आहे, असं संजय राऊत म्हणाले. राम मंदिराबद्दल भाजप पुढची रूपरेखा ठरवेल. कारण शिवसेना हा एनडीएचा एक घटकपक्ष आहे, असं संजय राऊत म्हणाले.
राम मंदिराबद्दल सरकारला आठवण करून देण्याची गरज नाही. २०२० मध्ये राज्यसभेत बहुमत मिळेल. २०१९ चं बहुमत राम मंदिरासाठी मिळालं आहे. त्यामुळे पुढची निवडणूक राम मंदिराच्या मुद्द्यावर लढावी लागणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.