नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील घोडनदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. प्रेम विजय पवार (वय- १०,) काजल विजय पवार (वय- १५) अशी मृतांची नावे आहेत. दोघे पुणे येथील विश्रांतवाडी येथील रहिवासी होते. सुट्टीनिमित्त ते दोघे चुलत्यांकडे आले होते. कपडे धुण्यासाठी नदीवर गेले असता प्रेम पाय घसरून नदीत पडला असता काजल त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात घसरून बहीण भावाचा मृत्यू झाला.
दोघेही त्यांच्या चुलत्यांसोबत आज सकाळी साडे अकरा वाजेला कपडे धुण्यासाठी नदीवर गेले होते. त्यांच्याबरोबर मोठी बहीण व एक छोटा भाऊ होता. ते घाबरल्याने पाण्यात उतरले नाहीत. गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन्ही मृतदेह मंचर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. मंचर पोलीस अधिक तपास करत आहे. बहीण भावाच्या या आकस्मिक मृत्यू विषयी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.