उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, अतुल सावे , क्षीरसागर , विखेपाटील आदींच्या नावांची चर्चा

रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. त्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. तर आरपीआयतर्फे अविनाश महातेकर शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शपथविधी सोहळा राजभवन येथील गार्डनवर पार पडणार आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या सात जागा रिक्त आहेत. त्याचे नेमके काय करायचे यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत तीन पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंत्रिमंडळात सात जागा रिक्त आहेत. या जागांवर कोणत्या नेत्यांची वर्णी लागते ते पहाणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील आठवड्यात विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होईल. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जातो आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीचे आव्हान फत्ते करण्यासाठी मुंबई आणि दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता मुंबईत हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री अतिंम योजना तयार करत आहेत. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सुजय विखेही होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विखे यांच्यासोबत काँग्रेसमधले त्यांचे काही समर्थक आमदारही भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना कसं सामवून घ्यायचे, पुढती रणनीती काय असेल अशा सगळ्या मुद्यांची या बैठकीत चर्चा झाली अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे विश्वासू गिरीश महाजन हेही सहभागी झाले होते.