अमिताभ यांचे सामाजिक उत्तरदायित्व, पुलवामा शहिदांच्या कुटुंबियांना घरी बोलावून केला सन्मान !!

बिहारमधील २१०० शेतकऱ्यांचं कर्ज फेडल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांना आज आर्थिक मदतीचा हात दिला. मुंबईत आपल्या निवासस्थानी त्यांनी मदतीचे धनादेश शहिदांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. यावेळी अभिषेक बच्चन आणि कन्या श्वेता नंदा उपस्थित होत्या.
अमिताभ यांनी आपल्या अधिकृत ब्लॉगवर याबाबत माहिती दिली आहे. धनादेश वितरण करतानाचे फोटोही अमिताभ यांनी शेअर केले असून त्यात अमिताभ, अभिषेक व श्वेता भावुक झाल्याचे दिसत आहे.
अमिताभ यांनी ४९ शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आपल्या निवासस्थानी निमंत्रित केलं होतं. या सर्व कुटुंबांना पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत अमिताभ यांनी दिली.
शहिदांच्या कुटुंबीयांचे पत्ते मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्यात थोडा वेळ गेला असला तरी या प्रयत्नांना यश आलं आहे. शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मनोमन इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली आहे, असे अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. अमिताभ यांनी ट्विटरवरूनही कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.