युवा कवी सुशीलकुमार शिंदे आणि बालकादंबरीकर सलीम मुल्ला यांना साहित्य अकादमी पुरस्कार

यावर्षीच्या युवा साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. मराठी भाषेत सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहाला यंदाचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ‘जंगल खजिन्याचा शोध’ या सलीम मुल्ला यांच्या कादंबरीस बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
देशातील एकूण २३ विविध प्रादेशिक भाषांमधील युवा साहित्यिकांना हे पुरस्कार घोषित झाले. साहित्य अकादमीचे पुरस्कार १९५५ पासून दरवर्षी भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना दिले जातात. यात अनुवाद, युवा आणि बालसाहित्य पुरस्कारांचा समावेश आहे. एकूण २४ भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. यंदा २३ भाषांतील साहित्यासाठी पुरस्कार जाहीर झाले असून मैथिली भाषेतील पुरस्कार जाहीर व्हायचा आहे.
साहित्य अकादमीच्यावतीने देण्यात येणारा बालसाहित्य पुरस्कार तळंदगे (ता. हातकणंगले) येथील सलीम सरदार मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याच्या शोधात’ या बालकादंबरीस जाहीर झाला. जंगल खजिन्याचा शोध या कादंबरीत मुल्ला यांनी अतिषय उत्कंठावर्धक कथा गुंफली आहे. जंगलातील मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या बालचमूचे चित्रण या कादंबरीत केले आहे. मुल्ला यांनी वनविभागात वनसंरक्षक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा केली आहे. यादरम्यान त्यांनी केलेली निरीक्षणे या कादंबरीच्या रुपाने अगदी प्रभावी मांडली आहेत.