दहशवाद्यांच्या विरोधात सर्व मानवतावाद्यांनी एकत्र येण्याची गरज : नरेंद्र मोदी

किर्गिस्तानातील बिश्केक येथे सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत (एससीओ) दहशतवादाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सुनावले. आजच्या घडीला दहशतवाद ही मोठी समस्या बनली असून दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी परिषदेत केले. दहशतवादाला समर्थन, प्रोत्साहन देणाऱ्या, तसेच त्यासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या राष्ट्रांविरोधात बोलण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्टपणे म्हटले. दहशतवादाविरोधातील आपले संकुचित विचार सोडून मानवतावादी शक्तींनी पुढे आलेच पाहिजे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता परिषदेत केले.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या काही मिनिटांच्या भाषणात दहशतवादासहित इतर अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रांनी पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असल्याचे म्हणत त्यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करण्याचे आवाहन केले. दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी सर्व एससीओ देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचेही मोदी म्हणाले.