न्यायालयाच्या आदेशानंतर धनंजय मुंडे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता धनजंय मुंडे यांच्यासह १४ जणांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी तक्रारदार राजाभाऊ फड चार दिवसांपासून बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये बसून होते. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आजच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात काय सुनावणी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यासह चंद्रकांत रणजीत गिरी, ज्ञानोबा सीताराम कोळी, गोविंद सीताराम कोळी, बाबू सीताराम कोळी, उद्धव कचरू सावंत, माणिक तुकाराम भालेराव, विठ्ठल गणपतराव देशमुख, धोंडीराम अण्णा चव्हाण, दिगंबर वसंत पवार, राजश्री धनंजय मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे, वाल्मिक बाबुराव कराड आणि सूर्यभान हनुमंतराव मुंडे या १४ जणांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६८, ४६५, ४६४, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील पूस, येथील जुने सव्र्हे नंबर २४, २५ आणि इतरही शासकीय जमीन आहे. ही जमीन बेळखंडी मठाला इनाम म्हणून देण्यात आलेली होती. मठाचे महंत रणजित व्यंका गिरी होते. ही जमीन शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरित होऊ शकत नाही. मात्र, मठाधिपतींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसाने ही जमीन संगनमताने स्वतच्या नावे नोंदवून घेतली तसेच ही जमीन आपली असल्याचे दावे दाखल करून स्वतच्या नावे हुकूम काढून घेतले. शासनाला याची कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. ही सर्व जमीन नंतर धनंजय मुंडे यांनी मुखत्यारनाम्यांआधारे खरेदी केली आणि ती अकृषक (एन. ए.) केली. ही जमीन शासनाची असल्याने शासनाला अंधारात ठेवून फसवणूक करून तिची परस्पर विल्हेवाट लावली आणि तशा नोंदी करवून घेतल्या. ही शासनाची फसवणूक असल्याने कलम ४२० अन्वये तसेच शासनाच्या परवानगीविना बनावट कागदपत्रांआधारे जमीन हस्तांतरित करण्यात आल्याने या कृतीस लागू असणाऱ्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात यावा अशी तक्रार फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय दबावामुळे या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तक्रारदार राजाभाऊ फड यांनी उच्च न्यायालय खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. यात धनंजय मुंडे, त्यांची पत्नी राजश्री मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे आदी १४ जणांविरोधात गुन्हा नोंदवून तपास पूर्ण करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली होती.