मार्डच्या संपामुळे रुग्णांचे देशभर हाल , संप मागे घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील खासगी व सरकारी रुग्णालयांतील निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांनी पुकारलेल्या ‘कामबंद’ आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंबई, दिल्लीसह देशाच्या विविध भागांत सकाळपासूनच या आंदोलनाचा परिणाम जाणवत असून रुग्णांची गैरसोय होत आहे. विशेषत: ओपीडी सेवा कोलमडली आहे. राज्याच्या सार्वजनिक रुग्णालयांमधील सुमारे १० हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाल्यानं मुंबईसह राज्यातील वैद्यकीय सेवेवरही याचा परिणाम दिसून येत आहे.
डॉक्टरांना रुग्णालयांत सुरक्षित वातावरण द्या, डॉक्टरांवर हल्ला केलेल्या आरोपींना तातडीने पकडा, अशा प्रमुख मागण्या डॉक्टरांच्या संघटनांनी केल्या आहेत. नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानासह राज्यातील सरकारी व बाह्य रुग्ण विभाग, वॉर्ड तसेच व्याख्यानालाही निवासी डॉक्टरही वैद्यकीय सेवा देणार नाहीत, मात्र यावेळी आपत्कालीन सेवा सुरू ठेवली जाईल, अशी माहिती सेंट्रल मार्डच्या अध्यक्षा डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली. राज्यातील १७ सरकारी व पालिका रुग्णालयांतील साडेसात हजार निवासी डॉक्टर आणि दोन हजार शिकाऊ (इंटर्न) डॉक्टर उद्या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. निषेध आंदोलनामुळं रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनानं पर्यायी व्यवस्था केली आहे. असं असलं तरी बाह्य रुग्ण विभाग व वॉर्डमधील सेवेवर ताण येत आहे.
कोलकाता येथील ज्युनिअर डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यातली प्रत्येक शासकीय रूग्णालयातले मार्डचे डॉक्टर संपावर गेले आहेत. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या दरम्यान हे डॉक्टर संपावर आहेत. या दरम्यान कोणतीही अत्यावशक सेवा बाधित होणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर छत्तीसगढ, दिल्ली या ठिकाणचेही निवासी डॉक्टरही संपावर गेले आहेत.
दिल्ली येथील एम्स रूग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनीही संप पुकारला आहे. या निषेध आंदोलनामुळे रूग्णांचे होणारे हाल टाळता यावेत यासाठी रूग्णालयांनी विशेष खबरदारी घेतली आहे. दरम्यान केरळमधल्या निवासी डॉक्टरांनी कोलकाता येथे झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी संप पुकारला आहे
डॉक्टरांना रूग्णालयांमध्ये सुरक्षित वातावरण दिले गेले पाहिजे, ज्या डॉक्टरवर हल्ला केला गेला त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशा मागण्या संपावर गेलेल्या डॉक्टरांनी केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ज्युनिअर डॉक्टरवर झालेल्या दोन हल्ल्यांमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मार्डच्या डॉक्टरांनी केली आहे. राज्यातली सरकारी आणि पालिका रूग्णालये बंद ठेवणार असल्याची घोषणा सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटना आणि असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्र या कनिष्ठ वैद्यकीय डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.