मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी , मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम

गेले दोन महिने उन्हामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या हजेरीने दिलासा मिळाला आहे. मुंबईसह उपनगरात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई सीएसटी, दादर, परळ, विलेपार्ले आदी भागांसह उपनगरातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, चकाला, घाटकोपर, अंधेरी, सांताक्रूझ या भागांमध्ये सायंकाळनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. अरबी समुद्रातील दक्षिणपूर्व भाग, लगतचा लक्षद्वीप आणि मध्यपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडत असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पावसाच्या दमदार हजेरीमुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. कोपर रेल्वे स्थानकात पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रखडल्या आहेत. तर वांद्रे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर ट्रिप झाल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्या सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. चुनाभट्टी येथे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाशीला जाणारी लोकल स्थानकावर थांबली आहे. यामुळे सीएसएमटी कुर्ला हार्बर मार्ग ठप्प झाला होता. पहिल्या पावसाचा फटका लोकलच्या तीनही मार्गांना बसल्याने घरी जाण्याऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी पाऊस कोसळण्याची दाट शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात हा पाऊस होणार आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मंगळवार हा पावसाचा वार ठरण्याची शक्यता आहे. अर्थात केरळात दाखल झालेल्या मोसमी पावसाने अद्याप राज्यात वर्दी दिलेली नाही. त्यामुळे उद्याचा पाऊसदेखील पूर्व मोसमीच असेल, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.