शरद पवार फेसबुक लाईव्ह : एअर स्ट्राइकशिवाय संघाविषयी , माध्यमांविषयी आणि ईव्हीएम विषयी काय म्हणाले पवार ? ?

पवारांच्या फेसबुक लाईव्ह ची चर्चा सध्या . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी देशाच्या ऐक्याला घातक असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पक्षाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त फेसबुक लाइव्हद्वारे जनता व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना केला. न्यूज चॅनेल आणि प्रसारमाध्यमे, अशा दोन्हींवर सरकारचा दबाव असल्याचा आरोप करून १९७७ साली जनतेने इंदिरा गांधी, संजय गांधी यांचा पराभव केला होता. त्यामुळे कोणी शक्तिमान असल्याचे समजण्याचे कारण नाही. तसेच ईव्हीएमचा फेरविचार निवडणूक आयोगाने करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे.
‘लोकांनी विश्वास टाकल्यानंतर दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असते. जे काम आम्ही केले, त्याचा उदो उदो करण्याची आमची वृत्ती नाही. मोदींचे तसे नाही, ते न केलेल्या कामाचेदेखील श्रेय घेतात,’ अशी टीकाही पवार यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जनतेशी संपर्क तुटला काय, या प्रश्नावर त्यांनी लोकांशी थेट सुसंवाद करणे गरजेचे आहे. ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियाच्या आधारे लोकांशी संवाद करावा लागेल. कार्यकर्त्यांनी गावात जाऊन छोट्या छोट्या सभा घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे, असे पवार म्हणाले.
आजमितीस सर्व न्यूज चॅनेल प्रसारमाध्यमे यांच्यावर केंद्र व राज्य सरकारचा दबाव असल्याचा दावा करून, प्रसारमाध्यमांना दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती आम्हाला प्रसारमाध्यमांतील मित्रांकडून मिळत असते. त्यांच्याकडे सर्व यंत्रणा असल्यामुळे ते त्याचा गैरवापर करत आहेत. पण त्यांनी एक गोष्ट घ्यावी, १९७७साली इंदिरा गांधीचा पराभव झाला होता. संजय गांधीही पराभूत झाले होते. त्यामुळे कोणी कुणाला शक्तिमान समजू नये.
देशात पुरोगामी चळवळी कमकुवत झाल्या आहेत असा प्रश्न विचारता पवार म्हणाले की, धर्माच्या नावाखाली लोकांना भडकाविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे राष्ट्र सेवा दल, युक्रांद यासारख्या संघटना वाढविणे गरजेचे आहे. या देशात फुले शाहू आंबेडकर यांच्या आधुनिकतेच्या विचाराला प्रोत्साहन दिले पाहिजे. तो विचार रुजवला पाहिजे, असेही ते म्हणाले. विदर्भातील संघटनात्मक धोरणाविषयी बोलताना पवार म्हणाले की, विदर्भात आम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. विदर्भातील जनतेशी सुसंवादाचा वेग कमी झाला आहे. पण सोमवारी-मंगळवारी तेथील जनतेची आम्ही भेट घेणार आहोत. लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत.
जगात फक्त तीन देशच निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर करतात. यात भारत, युंगाडा आणि आफ्रिकेतील एका देशाचा समावेश आहे. त्यामुळे ही मशीन योग्य नाही हे जगाचे मत आहे. लोकांच्या मनात शंका निर्माण होत असतील तर ही बाब लोकशाहीसाठी बरी नाही. निवडणुकांसाठी जुनी पद्धत आणण्याची लोकांची मागणी आहे. ईव्हीएमचा फेरविचार करण्याची आयोगाला गरज आहे, असे पवार म्हणाले.