मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचे संकेत

रविवारीच्या तुरळक पावसानंतर मंगळवारी ११ जून रोजी मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वेधशाळांच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असून त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबई व किनारी भागामध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अरबी समुद्रात दक्षिण-पूर्व भागात व लक्षद्वीपजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे व येत्या ४८ तासांमध्ये त्याची व्याप्ती वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे कोकणासह मुंबईमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो तसेच वादळी वारे वाहू शकतात असा अंदाज आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाले की त्याच्या परिणामी किमाऱ्यालगतच्या प्रदेशांमध्ये पाऊस सुरू होतो. कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता जास्त असेल तर वादळी वाऱ्यांसह पाऊस येतो, जी स्थिती सध्या दिसत आहे. स्कायमेटनंही अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याचे व त्यांची तीव्रता वाढत असल्याचे म्हटले आहे. परिणामी 11 व 12 जून रोजी मुंबईत पाऊस कोसळण्याचा व कदाचित वादळी वारे वाहण्याचा अंदाजही स्कायमेटनं व्यक्त केला आहे.
जूनचा पहिला आठवडा संपताना मुंबईत पावसाचे आगमन होते, परंतु त्यास तीन दिवस उलटून गेले असून प्रचंड उकाड्यानंही मुंबईकर हैराण झाले आहेत. वेधशाळांच्या अंदाजानुसार मंगळवारी मुंबईसह कोकणच्या किनारपट्टीवर पावसाचे आगमन झाले तर नागरिक सुखावतील यात शंका नाही.