चर्चेतल्या बातम्या : मुख्यमंत्रीपदावर भाजपने रुमाल टाकल्याने सेनेची कोंडी !!

कधी काळी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेचे महत्व असताना आज बाहुबली झालेल्या भाजपने लहान भावाची भूमिका अत्यंत खुबीने वठवीत राजकीय सत्तेत चंचू प्रवेश केला होता. पहिल्यांदा महाराष्ट्रात सेना भाजपची सत्ता आली तेंव्हा भाजपने आपल्या मर्यादा ओळखून दुधाची तहान ताकावर भागवीत उप मुख्यमंत्री पदावर समाधान मानले होते तर मोठा भाऊ म्हणून शिवसेनेने मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठवले होते परंतु सेनेचा हात धरून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधीश झालेल्या भाजपने आज घडीला मात्र आपले राजकीय अस्तित्व वाढवीत शिवसेनेला राजकीय शह देण्याचा अमित शाही प्रयत्न केला असल्याने सेनेची राजकीय कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बातमी अशी आहे कि ,
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला. अर्थात या विजयात शिवसेनेचाही मोठा वाटा होता. लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करताना शिवसेनेचं लक्ष हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवरही होतं. त्यासाठीच त्यांनी भाजपकडे ५०-५० जागा वाटपाचा फॉर्म्युला ठेवला आहे . पण आता दिल्लीत झालेल्या भाजपच्या बैठकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री व्हावा,अशी भूमिका भाजपने घेतल्यामुळे शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे .
भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या कोअर टीमसोबत घेतलेल्या बैठकीचे पडसाद आता उमटायला सुरुवात होईल असे चित्र आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब केलं. पण त्याचवेळी भाजपचाच मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेशही दिले आहेत. ज्याप्रमाणे मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जागांचा विचार केला नाही, त्याच पद्धतीने राज्यात मुख्यमंत्री आपला असावा यासाठी शिवसेना आणि मित्र पक्षाच्या जागा कशा निवडून येतील यासाठी काम करा, असा आदेश शहा यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या शिवसेनेला मात्र धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना नेमकी काही भूमिका घेणार कि , भाजपसमोर सरेंडर होणार हा खरा प्रश्न आहे.