Kathua gang rape and murder case: तिघांना जन्मठेप, तिघांना पाच वर्षाचा तुरुंगवास

जम्मू-काश्मीरमधील कथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात पठाणकोटमधील सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर तिघांना पाच वर्ष कैद सुनावण्यात आली आहे. संजी राम, परवेश कुमार आणि दीपक खजुरीया या तिघांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. आज सकाळी न्यायालयाने सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवले तर एका आरोपीला सबळपुराव्याअभावी दोषमुक्त केले.
कथुआ येथील आठ वर्षांच्या मुलीचे घरातून १० जानेवारी २०१८ रोजी अपहरण झाले होते. तिला आठ दिवस एका मठात ओलीस ठेवण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि अघोरी धार्मिक विधीही केले गेले. त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आठवडाभरानंतर तिचा मृतदेह याच जंगलात आढळला होता. या सामूहिक बलात्कार प्रकरणाने देशाला हादरवून सोडले होते.
सुप्रीम कोर्टाने या खटल्याची सुनावणी जम्मू- काश्मीरबाहेर घेण्याचे आदेश दिले होते. यानुसार पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. ३ जूनला या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. या प्रकरणात एकूण ११४ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. सोमवारी न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. न्यायालयाने सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. मुख्य आरोपी सांजी राम, दीपक खजुरिया, सुरेंदर वर्मा, तिलक राज, आनंद दत्ता, परवेश कुमार या सहा जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर सांजी रामचा मुलगा विशाल याला न्यायालयाने दोषमुक्त केले. या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ आरोपींना अटक केली होती. यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून हे प्रकरण जम्मू- काश्मीरमधील हायकोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे आठ पैकी सात आरोपींविरोधात पठाणकोटमधील न्यायालयात सुनावणी झाली.
कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकूण आठ आरोपी आहेत. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. त्यामुळे सात आरोपींना सत्र न्यायालयात आणि एका आरोपीला काही महिन्यांपूर्वी ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात आले होते. आरोपींमध्ये सांजी राम, त्याचा मुलगा विशाल, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेट कॉन्सटेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांचा समावेश आहे. त्यांच्याविरूद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारवर अनेक कलम लावण्यात आली आहेत. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने चालू होती.
बकरवाल (मेंढ्या व घोडे पाळणारे) या भटक्या जमातीच्या बालिकेचे आठ वर्षे वयाच्या १० जानेवारी रोजी अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अत्याचारानंतर तिची हत्या केली. 17 जानेवारीला जंगलात चिमुकलीचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला विशालला अटक करण्यात आली होती.
पीडितेच्या वकिलांना वारंवार धमकावण्यात येत होते. त्यामुळे हे प्रकरण जम्मू काश्मीर राज्याबाहेरच्या न्यायालयात चालवण्यात यावं अशी याचिका पीडित कुटुंबियांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. आठ वर्षाच्या पीडित मुलीला न्याय देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या वकील दीपिका सिंह राजवंत यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. दीपिका यांनी तशी भीती बोलून दाखवली. माझ्या जीवाला धोका असून माझ्यावर बलात्कार केला जाऊ शकतो, असे दीपिका सिंह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. एका चिमुरडीला न्याय मिळावा यासाठी मी ही लढाई लढत आहे. मात्र, हा खटला घेतल्यापासून अप्रत्यक्ष माझ्यावर सर्वांनी
बहिष्कारच घातला आहे. त्यामुळे या लढाईत मी किती दिवस टिकेन माहीत नाही, असे अशी हतबलता दीपिका सिंह यांनी व्यक्त केली होती. माझ्यासोबत काहीही होऊ शकते. माझ्यावर बलात्कार होऊ शकतो. माझी हत्या केली जाऊ शकते किंवा माझी कोर्टातील प्रॅक्टिस थांबवली जाऊ शकते. सध्या मी अत्यंत भयंकर परिस्थितीतून जातेय. मला व माझ्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केल्याचंही त्यांनी म्हटले होते.