अंबरनाथच्या जुळ्या बहिणी रिद्धी -सिद्धी ने दहावी परीक्षेतही मिळविले ” जुळे ” गूण !!

देशभरात दहावीचा निकाल लागला मात्र या निकालानंतर अंबरनाथ तालुक्यातील जुळ्या बहिणीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. आंबेशिव भिनारपाडा गावातील रिद्धी व्यापारी आणि सिद्दी व्यापारी या दोन जुळ्या बहिणींना १० वीमध्ये सेम टू सेम टक्केवारी मिळाली असल्याची माहिती न्यूज १८ ने दिली आहे .
शनिवारी १० वीचा ऑनलाईन निकाल लागला. या निकालात रिद्धी आणि सिद्धीला ८४ टक्के मिळाले आहेत. इतकंच काय तर हिंदी आणि इंग्रजी या विषयांत दोघींना सारखेच गुण मिळाले आहेत. इतर विषयातदेखील दोघींच्या निकालात एक-एक मार्कांचा फरक आहे. त्यांच्या १०वी तील या सारख्याच यशामुळे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
आर्थिक परिस्थिती नाजूक असतांनादेखील आंबेशिव सारख्या गाव-खेड्यात राहणाऱ्या या जुळ्या बहिणींच्या १०वीतील यशामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आंबेशीवमधील सानेगुरुजी शाळेत या बहिणी १० वीत शिकत होत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिद्धी आणि सिद्धी शाळेत दुसऱ्या आल्या आहेत.
घरापासून शाळेचे अंतर हे दोन किलोमीटरचे आहे. रस्ते चांगले नसतांनादेखील रोज पायी शाळेत जाऊन त्यांनी हे यश संपादन केलं आहे. लहानपणापासून दोघींच्या आवडी-निवडी या बहुतांश सारख्या आहेत. विशेष म्हणजे एकाच पुस्तकावर दोघींनी अभ्यास केला.
आता वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन बँकेत नोकरी करण्याची त्यांची इच्छा आहे. त्या दिसायला सारख्या असल्याने अनेकदा शाळेतील शिक्षकांनादेखील त्यांना ओळखताना मोठा गोंधळ उडायचा. मुली दहावीत असल्यानं वर्षभर रिद्धी आणि सिद्धीच्या आईने त्यांना कधी घरातील कामे सांगितली नाही. बाबादेखील कामातून वेळ मिळेल तेव्हा त्यांचा अभ्यास घेत होते.