मुंबई: जुहू, मरीन ड्राइव्ह बीचवर दोघांचा बुडून मृत्यू

मुंबईत आज मरीन ड्राइव्ह आणि जुहू अशा दोन्ही ठिकाणी बुडण्याच्या घटना घडल्या. मरिन ड्राइव्ह येथे समुद्रात ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला तर जुहू बीचजवळ समुद्रात बुडून एका ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना दुपारी घडल्या. भैरव रमेश बरिया (मरीन ड्राइव्ह) आणि महेश शिंदे (जुहू) अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. जुहू बीचजवळ इस्कॉन मंदिराशेजारच्या समुद्राच्या भागात बुडून महेश शिंदे (४०) मृत्युमुखी पडले. अंधेरीत सीप्झ येथे राहणारे महेश शिंदे आपल्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांसोबत बीचवर आले होते. शिंदे मुलांसोबत पाण्यात खेळत होते. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलांना पाण्याबाहेर काढले पण ते आतच होते. लाटांचा जोर खूप वाढला आणि ते पाण्यासोबत ओढून आत गेले.
मुंबई अग्निशमन दल आणि लाइफगार्ड त्यांना वाचवण्यासाठी समुद्रात गेले. पण बराच वेळ शिंदे सापडले नाहीत. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. कूपर रुग्णालयात शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मरीन ड्राइव्ह येथे भैरव रमेश बरिया हा ११ वर्षीय मुलगा बुडाला. त्याला जी.टी. रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.