मुलगा हवा होता , मुलगी झाली म्हणून वडिलांनी सोडून दिले , त्याच श्रुतीने आईच्या पाठिंब्याने मिळवले ९७ टक्के गूण !!

आजोबा आणि आजीचा आत्मविश्वास तर आईच्या पाठिंब्यावर श्रुती चमरे या विद्यार्थिनीने शाळेतून पहिला क्रमांक पटकावत ९७ टक्के गुण मिळवले आहेत. आपल्या नातीने एवढे गुण मिळवल्यानंतर श्रुतीच्या आजी आजोबांनी तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच पुढे जाऊन ती मोठी गगन भरारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्याला भविष्यात जिल्हाधिकारी व्हायचे आहे, असा निश्चिय श्रुतीने केला आहे.
श्रुती चमरे हिचा संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. श्रुतीचा जन्म होताच तिचे वडील तिला सोडून दुसरीकडे राहण्यासाठी गेले. त्यानंतर तिचा सांभाळ आजोबा आणि आजीने केला आहे. तिच्या शिक्षणात तिच्या आईचे म्हणजे सुमित्रा चमरे यांचे मोलाचे योगदान आहे. श्रुतीच्या वडिलांना मुलगा हवा होता मात्र, श्रुती झाल्याने ते निराश झाले होते. त्यामुळेच ते आम्हाला सोडून गेले असे सुमित्रा यांनी सांगितले. त्यानंतर आजोबा हिरामण काची आणि आजी लता काची यांनी श्रुतीचा सांभाळ केला. त्यांनी शिक्षणात तिला काही कमी पडू दिलेले नाही. अवघड वाटणाऱ्या विषयांची तासिकादेखील लावली होती. मात्र, हे सर्व पाहण्यासाठी वडील नसल्याने श्रुतीचे डोळे पाणावले होते. जे काही करायचे आहे ते आईसाठी करायचा निश्चय तिने केला आहे. भविष्यात तिला जिल्हाधिकारी व्हायचे असून जनतेची सेवा करायची आहे.