आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ : भारताचा ऑस्ट्रेलियाला ‘दे धक्का’; ३६ धावांनी मात

भारताने दिलेल्या ३५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अतिशय चिवट झुंज देत ऑस्ट्रेलियाचा संघ ३१६ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताने या सामन्यासह वर्ल्ड कपमधील दुसऱ्या विजयाची नोंद केली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने ६१ धावांची भागिदारी केली. अॅरॉ़न फिंच आणि वॉर्न बाद झाल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि स्टीव्हन स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला होता. ऑस्ट्रेलियाच्या ३६ षटकांत २ बाद २०० धावा झाल्या होत्या. त्यानंतर बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद करून ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. तर भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाला डबल दणका दिला. त्याच्या गोलंदाजीवर एकाच षटकात स्टीव्हन स्मिथ आणि मार्कस स्टोइनिस बाद झाले. त्यानंतर चहलच्या गोलंदाजीवर मॅक्सवेल उंच फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था ४०.०४ षटकांत ६ बाद २४४ अशी झाली. त्यानंतर बुमराहने मागच्या सामन्यात विक्रमी खेळी करणाऱ्या कुल्टर नाइल आणि पेंट कमिन्सला बाद केले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताची सलामीची जोडी शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी 127 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा अर्धशतक करून बाद झाला. त्यानंतर शिखर धवननं ९५ चेंडूत आपलं शतक पुर्ण केले. यात १३ चौकारांचा समावेश आहे. शतकी खेळी केल्यानंतर ११७ धावा करत धवन बाद झाला. धवन बाद झाल्यावर चौथ्या क्रमांकावर केएल राहुल येणं अपेक्षित होतं. मात्र, त्याच्या ऐवजी थेट अष्टपैलू हार्दीक पांड्या फलंदाजीला मैदानात आला. कोहलीने केएल राहुलऐवजी पांड्याला वरती फलंदाजीला पाचारण केल्यानं सर्वांनाच धक्का दिला. पांड्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत तुफान फटकेबाजी केली. पांड्याने फक्त २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४८ धावा केल्या. हार्दीक पांड्या आणि कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूत ८१ धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर भारताने ३०० धावांचा टप्पा पार केला आणि ऑस्ट्रेलियासमोर ३५३ धावांचे आव्हान उभा केले होते.