अमित शहा यांनी बोलावली महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची बैठक

लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले असून त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्राच्या कोअर टीम सोबत बैठक घेतली आणि त्यांना निवडणुकीचा मंत्र दिला. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब केलं. ज्या प्रमाणे मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जागांचा विचार केला नाही त्याच पद्धतीने राज्यात मुख्यमंत्री आपला असावा त्यासाठी शिवसेना आणि मित्र पक्षाच्या जागा कशा निवडणून येतील यासाठी काम करा असा आदेश शहा यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणूक आणि संघटनात्मक निवडणुकांबाबत अमित शहा यांच्यासोबत चर्चा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीपूर्वी जाताना सांगितलं. आम्ही सध्या विधानसभा निवडणुकीच्या मोड मध्ये आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तारही होणार आहे पण प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार आहे की नाही या संदर्भात केंद्रीय निवडणूक समिती निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बैठकीआधी अमित शहा यांनी हरियाणा, झारखंड या राज्याच्या नेत्यांसोबतही बैठका घेत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार यासंदर्भात दिल्लीत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती . भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील भाजपचे जवळपास सर्वच मंत्री या बैठकीला उपस्थित होते . भाजपच्या दिल्ली मुख्यालयात या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना सत्ताप्राप्तीचा कानमंत्र दिला.
दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात बैठक होण्याआधी, महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली . भाजप संघटन सरचिटणीस रामलाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रवींद्र चव्हाण, जयकुमार रावल, संभाजी निलंगेकर, सुभाष देशमुख, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांची या बैठकीला उपस्थिती होती.