बॅलेट पेपरवर विधानसभा निवडणूक होणार नसेल तर बहिष्कार, सगळ्या विरोधी पक्षांना करणार आवाहन : प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर होणार नसेल तर आम्ही त्या निवडणुकीवरच बहिष्कार घालू अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. ईव्हीएममुळेच वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला असंही त्यांनी म्हटलं आहे. MIM शी हातमिळवणी करून वंचित बहुजन आघाडी उभी करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरून टीका केली आहे. तसेच ईव्हीएमवर आपला अजिबात विश्वास नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
बॅलेट पेपरवर मतदान होणार नसेल तर आम्ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच मी सगळ्या विरोधी पक्षांना याबाबत आवाहन करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. माझ्यासारखी भूमिका महाराष्ट्रातल्या इतर राजकीय पक्षांनीही घ्यायला हवी. मात्र मी माझ्या मतावर ठाम आहे आणि ते हेच आहे की बॅलेट नसेल तर विधानसभा लढणार नाही. आता माझं मत आमच्या पक्षात किती कॅरी होईल ते मी आत्ता ठामपणे सांगू शकत नाही पण त्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.