मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प

सध्याच्या पिढीने मराठवाड्यात बाराही महिने दुष्काळचं पाहिला आहे मात्र, आता पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही, हा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करु. त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला. औरंगाबादमधील दुष्काळाची आणि गंगापूरच्या फाईव्ह स्टार चारा छावणीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात जलयुक्त शिवारची कामं झाली नसती तर आत्तापेक्षा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला असता. जलयुक्तमुळे विहिरींना पाणी राहिलं त्यामुळे ग्रामीण भागात टँकरवीना बराच काळ पाणी पुरु शकलं. शेतीची उत्पादकताही वाढली. कमी पावसातही मोठं नुकसान झालं नाही, हे जलयुक्त शिवारचं यश आहे. दुष्काळापासून कायमची सुटका मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी राज्याला ४ हजार कोटींची मदत केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ११ प्रमुख धरणांची एक ग्रीड आम्ही तयार करतोय त्यांना पाईपने जोडण्याची योजना आहे. पाईपच्या माध्यमातूनच पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी पोहोचवायचे आहे. याचे दोन महिन्यांत टेंडरही काढण्यात येईल. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणता येईल, तसे झाले तर १०० टीएमसी पाणी आपण आणू शकतो त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली दुष्काळमुक्तीची भुमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, दुष्काळमुक्तीची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘स्वच्छ भारत’प्रमाणे पाण्यासाठी नवीन अभियान हाती घेतलंय, ते म्हणजे ‘जलशक्ती अभियान’. त्यासाठी नवीन मंत्रालयही स्थापन करण्यात आलं आहे. या माध्यमातून केंद्र सरकारकडून प्रत्येक गावाला, शेतीला पाणी पोहोचवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.