सरकारी आदेश : “लंच ब्रेक” घ्या पण ” नो टाईम पास “, सगळे एकाच वेळी “पंगत ” करू नका

“लंच ब्रेक” जरूर घ्या पण टाईम पास न करता सगळे एकाच वेळी जेवायला जाऊ नका असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत . मंत्रालयात येणारांचा अनुभव वर्षानुवर्षे असा होता कि , जेवणाच्या नावाखाली मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कामासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत ठेवायचे . सरकारच्या या नव्या जीआरनुसार शासकीय कार्यालयाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या असून कार्यालयीन वेळेत जेवणाची सुट्टी ही यापुढे फक्त अर्ध्या तासाची असणार आहे. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी जेवणाची वेळ ही १ ते २ या काळामध्ये जास्तीत जास्त अर्धातासाची देण्यात आली आहे. जेवणासाठी यापुढे आता अधिकारी आणि कर्चमाऱ्यांना अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ घेता येणार नाही. महत्वाचे म्हणजे एकाच शाखेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकाच वेळी जेवणासाठी जाता येणार नाही.
मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळा निश्चित नसल्यामुळे कोणताही कर्मचारी आणि अधिकारी सोयीनुसार जेवायला जातात. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना त्याचा फटका बसायचा त्याचे काम वेळेत व्हायचे नाही अशा तक्रारी वारंवार येत होत्या. शासकिय कामासंबंधित अर्ज, तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या या समस्यांवर सरकारने उपाय काढत आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ ठरवून दिली आहे. त्यामुळे आता यापुढे मंत्रालयामध्ये कामासाठी आलेल्या नागरिकांना साहेब जागेवर नाहीत असे उत्तर मिळणार नाही आणि त्यांची संबंधित कामे देखिल लवकर होण्यास मदत होणार आहे.