शिवसेनेचा देव देव :१८ खादारांसह उद्धव ठाकरेंचं १६ जूनला अयोध्येत जय श्रीराम !

लोकसभेच्या निकालानंतर सध्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या १८ खासदारांना सोबत घेऊन देव देव करण्यात बिझी आहेत . महाराष्ट्रातील देवदर्शनानंतर ते आता आपल्या १८ खासदारांसह १६ जून रोजी अयोध्येत जाणार आहेत. अयोध्येतील रामलल्ला मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार हे आधीच ठरलं होतं. मात्र त्या दौऱ्याची तारीख समोर आली नव्हती. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. १६ जून रोजी ते अयोध्येत जातील आणि राम मंदिर निर्मितीचा आढावा घेतील असेही समजते आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधी २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात सहकुटुंब अयोध्येत भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचेही दर्शन घेतले होते.तसेच राम मंदिराच्या निर्मितीचा मुद्दा पुढे आणून त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला होता. आधी राम मंदिराच्या बांधणीला कधी सुरुवात करणार ते सांगा त्यानंतरच युतीची बोलणी होईल अशी भुमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यावेळी शिवसेना-भाजपा यांच्यात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना-भाजपा यांच्यामध्ये फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर विचार सुरु आहे. मात्र, जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.