Bad News : औरंगाबादमध्ये पाण्याच्या टँकरखाली चिरडून 9 वर्षीय मुलीचा मृत्यू

औरंगाबादमध्ये पाण्याच्या टँकरखाली चिरडून एका चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबादच्या जयभवानी नगरमध्ये ही घटना घडली आहे. पाण्याचा टँकर रिव्हर्स घेत असताना चाखाखाली येऊन ९ वर्षाच्या नेहा दंडे या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जयभवानी नगरमध्ये खळबळ उडाली आहे.
जयभवानी नगरमधील गल्ली क्रमांक ११ मध्ये पाण्याचा टँकर आला. पाणी भरण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. पाणी वाटप संपल्यानंतर टँकर चालकाने टँकर मागे घेण्यास सुरुवात केली असता टँकरच्या मागच्या चाकाखाली येऊन नेहाचा मृत्यू झाला. नेहा तिच्या आईसोबत औरंगाबाद येथे आली होती. कर्नाटकातील मुदळके गावामध्ये राहणाऱ्या पार्वती दंडे हे त्यांच्या मोठ्या मुलीला भेटण्यासाठी औरंगाबाद येथे आल्या होत्या. यावेळी त्याच्यासोबत त्यांची छोटी मुलगी नेहा देखील आली होती.
नेहा आईस्क्रिम आणण्यासाठी दुकानात गेली होती. आईस्क्रिम घेऊन ती तिची मोठी बहिण अनिता गायकवाड हिच्या घरी परत येत होती. मात्र त्याचवेळी तिच्यावर काळाने घाला घातला. टँकरच्या चाकाखाली आल्यामुळे तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे जयभवानी नगरमध्ये एकच खळबळ उडाली होती. घाबरलेल्या टँकर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यामध्ये नेहाच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.