मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा : नेमके मुद्दे काय होते ?

लोकसभेची धाम धूम संपताच महाराष्ट्रात मिळालेल्या दमदार यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्व आहे . या दौऱ्यात त्यांनी केंद्रातील जास्तीची मंत्रिपदे आणि लोकसभेच्या उपाध्यक्षपदावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेसोबत आगामी विधानसभा निवडणुकीत करावयाच्या जागावाटपाच्या मुद्यावर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. महाराष्ट्र प्रदेश भाजप आणि मुंबई भाजपच्या अध्यक्षपदावर करावयाच्या नियुक्त्यांविषयीही या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा उद्देश अमित शहा यांच्यासोबत विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल होऊ घातलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिमंडळातील संभाव्य समावेश, एम. पी. मिल प्रकरणी लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर ओढलेले ताशेरे तसेच केंद्रात मंत्री झालेले रावसाहेब दानवे आणि कार्यकाळ संपत आलेले मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्याजागी करावयाच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्त्या अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांची भेट झाली. आशीष शेलार यांनीही अमित शहा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस अमित शहा यांच्याशी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत आल्याचे भासविण्यात येत असले तरी राज्यात चार महिन्यांनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी जागावाटपाचे कोणते सूत्र असावे हाच मुद्दा महत्त्वाचा ठरल्याचे समजते. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच निवडणुकीचे वेध लागणार असल्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी तसेच मुंबई भाजपाध्यक्षपदी कोणाची निवड करायची याचीही चर्चा फडणवीस-शहा बैठकीत झाल्याचे समजते. दानवे पाटील राज्यमंत्री झाल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे किंवा हंसराज अहीर यांची नावे विचाराधीन असल्याचे समजते, तर मुंबई भाजपाध्यक्षपदासाठी ईशान्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांच्या नावाची चर्चा आहे.
दरम्यान एसईबीसी आणि आर्थिक कमकुवत घटकांना आरक्षण दिल्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या ८१३ तर पदवी शाखांमध्ये १,७४० जागा वाढवून देण्यात याव्या, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.