मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोन करुन फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. विधानसभेच्या तयारीसंदर्भात काँग्रेसची मुंबईत बैठक झाली. बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘काँग्रेसच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री आणि काँग्रेस सोडून गेलेले नेते फोन करुन भाजपमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भाजपच्या गळाला काही लागणार नाही’, असं अशोक चव्हाण म्हणाले.
लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे विधानसभा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम केला. तर औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तार यांनीही काँग्रेस विरोधात बंड पुकारलं. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरु झाल्याची चर्चा आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी अशोक चव्हाण यांचे आरोप फेटाळून लावले. ‘काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. आताही माझ्याकडे २५ हून अधिक जणांची यादी आहे. काँग्रेसचे नेते स्वत:हून माझ्याशी संपर्क साधत आहेत. आम्ही फोडाफोडी करत नाही’, असं गिरीष महाजन म्हणाले.