‘त्या’ शोभा यात्रेत गैर काहीच नाही , पोलिसांवरच गुन्हे दाखल व्हावेत , विश्व हिंदू परिषदेची पत्रकार परिषद

विश्व हिंदू परिषदेने पिंपरी चिंचवड मध्ये काढलेल्या सशस्त्र शोभायात्रेत गैर काहीच नव्हते उलट आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवरच गुन्हे दाखल व्हायला हवेत असा अजब दावा विश्व हिंदू परिषदेच्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मात्र त्यांनी काढता पाय घेतला. पिंजारी चिंचवड मधील अंकुश चौक ते ठाकरे मैदान या भागात सशस्त्र शोभा यात्रा काढली होती . या शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुलींच्या हातात मोठ्या प्रमाणात एअर गन आणि तलवारी देण्यात आल्या होत्या. रविवारी संध्याकाळी ५ ते १० या वेळेत हि शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेत २०० ते २५० महिला आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते .
या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष शरद इनामदार , जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे , जिल्हा मंत्री नितीन वाटकर यांच्यासह २०० ते २५० कार्यकर्त्यांवर निगडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपस करीत आहेत .
विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत मुलींकडील बंदुका या प्रतिकात्मक होत्या, त्यामुळे आर्म ऍक्ट लागू होत नाही. पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत तसेच दोन पोलीस अधिकाऱ्यांवर सक्तीची कारवाई करावी, अन्यथा पुढील आठवड्यात हजारोंच्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कुलकर्णी म्हणाले, पोलिसांनी दिलेल्या सूचना आम्ही मान्य केल्या होत्या. विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनीकडून सात दिवसांच्या वर्गामध्ये प्रतिकात्मक शस्त्रांचे प्रशिक्षण दिले गेले. अंकुश चौक ते ठाकरे मैदान यमुनानगर येथील शोभा यात्रेसाठी पोलीस प्रशासनाने निगडी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार आणि गुन्हे पोलीस निरीक्षक निकाळजे सोबत दिले, सोबत पोलिसांचा ताफा ही दिला होता. त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत वाद केला. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मुलींकडे खऱ्या बंदुका असून त्या हवेत गोळीबार करत जात असल्याचे सांगितले. मात्र ती प्रतिकात्मक शस्त्रे असल्याचे आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. एअर रायफलवर कुठल्या अॅक्टनुसार गुन्हा दाखल होत नाही. काही अघटीत घडले असते तर त्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली असती का? असा सवाल विवेक कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने संबंधित गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. या घटनेकडे गांभीर्याने पाहून दोन पोलीस अधिकाऱ्यांवर सक्तीची कारवाई करावी. जर, हे घडलं नाही तर पुढील आठवड्यात हजारोंच्या संख्येने पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, त्यानंतर पुढील घटनांना पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा थेट इशाराही यावेळी कुलकर्णी यांनी दिला.