गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच अमित शहा यांनी जाहीर केली टॉप टेन अतिरेक्यांची यादी

केंद्रात गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमित शहा सक्रिय झाले असून त्यांनी आज सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काश्मीरमधील टॉप टेन अतिरेक्यांची यादी तयार केली आहे. या यादीत दहशतवादी रियाज नाइकू, ओसामा, अशरफ मौलवीचाही समावेश असून हे दहाही दहशतवादी सुरक्षा दलाच्या निशाण्यावर असणार आहेत. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सुरू केलेलं असतानाच काश्मीर खोऱ्यातील मोस्ट वाँटेड अतिरेक्यांची यादीही तयारी केली आहे. काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या या अतिरेक्यांमध्ये हिजबूल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या पाच महिन्यात सुरक्षा दलाने काश्मीर खोऱ्यात १०१ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. त्यात २५ विदेशी आणि ७६ काश्मीरी अतिरेक्यांचा समावेश आहे. अद्यापही काश्मीर खोऱ्यात २८६ अतिरेकी सक्रिय असून त्यात स्थानिक अतिरेक्यांचा भरणा अधिक आहे.
टॉप टेन अतिरेक्यांची यादीत रियाज नाइकू उर्फ मोहम्मद बिन कासिम , वसीम अहमद उर्फ ओसामा , मोहम्मद अशरफ खान उर्फ अशरफ मौलवी , मेहराजुद्दीन , डॉ. सैफुल्ला उर्फ सैफुल्ला मीर उर्फ डॉ सैफ , अर्शद उल हक , हाफिज उमर , जाहिद शेख उर्फ उमर अफगानी , जावेद मट्टू उर्फ फैसल उर्फ साकिब उर्फ मुसैब , एजाज अहमद मलिक यांचा समावेश आहे .