Malegaon Blast : पुन्हा प्रकृतीचे कारण सांगून न्यायालयात अनुपस्थित राहण्याची परवानगी मागणाऱ्या प्रज्ञा सिंह यांना आता दिलासा नाही

भोपाळ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या साध्वी प्रज्ञा यांना मालेगाव स्फोट प्रकरणी न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. विशेष एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. प्रज्ञा सिंह यांनी प्रकृतीचं कारण देत न्यायालयात अनुपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. न्यायालयाने मात्र प्रज्ञा सिंह यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.
खासदार साध्वी प्रज्ञा सध्या प्रकृतीच्या कारणांमुळे जामीनावर बाहेर आहेत. न्यायालयाने मालेगाव स्फोट प्रकरणी त्यांना जामीन दिला आहे. अद्याप त्यांची दोषमुक्ततता करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर UAPA (बेकायदेशीर कार्यवाही प्रतिबंधक कायदा) अंतर्गत केस सुरु आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे एका दुचाकीत बॉम्बस्फोट करण्यात आला होता. या स्फोटात सात लोकांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जखमी झाले होते. सरकारने या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला होता. २४ ऑक्टोबर २००८ रोजी याप्रकरणी स्वामी असीमानंद, कर्नल पुरोहित यांच्यासहित साध्वी प्रज्ञा यांना अटक करण्यात आली होती. तीन आरोपी फरार दाखवण्यात आले होते. नंतर हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता.